“जल्लोष शिक्षणाचा” उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत – खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे.

PCC NEWS

“जल्लोष शिक्षणाचा” उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत – खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे. 

पिंपरी, दि. २४ जानेवारी २०२४ : महापालिका शाळांमध्ये झालेले वैविध्यपूर्ण बदल, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध महत्वाकांक्षी उपक्रम आणि आदर्श शिक्षक यामुळे महापालिका शाळांचे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस निश्चितच मदत झाली आहे, असे मत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महापालिका शाळांचे यश साजरे करण्यासाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी “जल्लोष शिक्षणाचा २०२४” या कार्यक्रमाचे महापालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे बोलत होते.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, थरमॅक्स उद्योग समूहाच्या माजी अध्यक्षा अनु आगा, कमिन्स इंडियाचे संचालक प्रदीप भार्गव, आकांशा फाउंडेशनच्या जयश्री ओबेरॉय तसेच विविध विभागांचे प्रमुख, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे यावेळी म्हणाले, जल्लोष शिक्षणाचा यांसारख्या उपक्रमांमुळे महापालिका शाळांबद्दलचा दृष्टिकोन किंवा नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास निश्चितच मदत झाली आहे. आता पालक आपल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत आहेत. जल्लोष शिक्षणासारख्या उपक्रमांमुळे केवळ पिंपरी चिंचवड महापालिकेतच नव्हे तर राज्याच्या विविध शाळांमध्येही राबविला जाणे गरजेचे आहे ज्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस नक्कीच मदत मिळू शकेल, असे सांगून त्यांनी महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांना पाहून आनंद वाटला. जल्लोष शिक्षणाचा अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे लहान मुलांना अतिशय कमी वयातच मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच यामुळे त्यांच्या मनातील भीती दूर होण्यासही मदत मिळत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. भविष्यात अंतराळवीर कल्पना चावला, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारखे मोठे व्यक्तिमत्व शाळांमधून निर्माण होतील आणि ते आपल्या देशाचे नाव निश्चितच उज्ज्वल करतील. मोबाईलमध्ये हरवलेल्या आजकालच्या मुलांना आभासी जगातून बाहेर काढून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी हा आमचा दृष्टिकोन आणि हेतू जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमामुळे साध्य होत आहे. या उपक्रमाची कल्पना महापालिका शाळांमधील शिक्षकांची असून त्यांनीच या कार्यक्रमाचे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केले. भविष्यात विद्यार्थी, पालक आणि प्रत्येक शाळेने हा उपक्रम हाती घेतला तर वर्षानुवर्षे हा उत्सव असाच चालू राहील यात शंका नाही. महापालिका शाळांमध्ये नुकतीच ३२ क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये ३२ कला शिक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. दर शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे जेणेकरून अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा विविध खेळ उपक्रमांमध्ये सहभाग वाढविता येईल.

विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून जल्लोष शिक्षणाचा हा भव्य कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे, तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी महापालिका शाळांमधील सर्वोत्कृष्ट शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली असून शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचाही सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांनी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक तसेच आर्थिक क्षेत्रात नावलौकिक मिळवावा हा यामागचा हेतू आहे. तसेच जल्लोष शिक्षणासारख्या उपक्रमांमुळे हा हेतू निश्चितच साध्य होईल असा विश्वास आयुक्त सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक आयुक्त शेखर सिंह यांनी, सूत्रसंचालन मयुरी मालनकर आणि नितीश कामदार यांनी केले,तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment