पिंपरी-चिंचवडमधील २०० हून अधिक कारसेवकांचा शंकर जगताप यांच्याकडून गौरव
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने शहरातील २०० हून अधिक कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत असताना त्यासाठी कारसेवकांनी केलेला संघर्ष, समर्पण आणि दिलेली प्राणांची आहुती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच या कारसेवकांचा गौरव महत्त्वाचा असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने कासारवाडी येथील श्री दत्त सेवा कुंज आश्रम येथे श्री रामजन्मभूमी अयोध्येत १९९० ते १९९२ यादरम्यान गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कारसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय केंद्रीय सहमंत्री तथा सत्संग सहप्रमुख महेंद्रदादा वेदक यांच्या हस्ते २०० हून अधिक कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा लोखंडे, डॉ. गिरीश आफळे, महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती श्री.विलास मडीगेरी, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.अमित गोरखे, भाजप शहर विस्तारक श्री.नंदू कदम आदी उपस्थित होते.
महेंद्र वेदक म्हणाले, “प्रभू श्रीराम म्हणजे प्रयत्न आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यांच्यापासून आपणाला विश्वास आणि प्रेरणा मिळते. प्रत्येकजण रामाचा आणि राम प्रत्येकाचा आहे. आदर्श राजा, आदर्श पुरूष प्रभू रामचंद्र आपला श्वास आहे. त्यांच्याविना जीवन शून्य आहे. अयोध्येत राम मंदिर होत असल्याचा हिंदूंबरोबरच ७० टक्के मुस्लिमांनाही आनंद आहे. राम मंदिर पूर्ण होतेय म्हणजे देशभरातील रामभक्तांच्या स्वप्नांचा संकल्प पूर्ण होत आहे. या संकल्पपूर्तीसाठी अनेकांनी बलिदान दिल्याचे त्यांनी सांगितले.”
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “अयोध्येत राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा एक सुवर्ण क्षण ठरणार आहे. हिंदू समाजातील सर्वांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी अनेक कारसेवकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. त्यावेळी संघर्ष केलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कारसेवकांचा सत्कार म्हणजे राम मंदिर निर्माणाच्या आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासारखा असल्याचे त्यांनी सांगितले.”
शहरातील सर्व कारसेवकांना एकत्र करण्यासाठी भाजप शहर विस्तारक श्री.नंदू कदम यांनी विशेष कष्ट घेतले. त्याबद्दल भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. गिरीश आफळे व डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी कारसेवेतील अनुभव कथन केले. पिंपरी चिंचवड भाजपा विस्तारक श्री.नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.रमेश काशिद, श्री.भाऊ जाधव, डॉ. देवीदास शेलार, श्री.हनुमंत डुंबरे, भाजप शहर सरचिटणीस श्री.सागर फुगे, श्री.राजू नागणे, श्री.अजय दुधभाते उपस्थित होते.